Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
शास्त्र-तंत्रज्ञानाचा उत्तम मिलाफ:

डॉ. आनंद कुलकर्णी यांना आयुर्वेदाचा परिचय वडिलांकडूनच घडला. त्यांचे वडिल आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत होते. समजत्या वयात आयुर्वेदातले शब्द, औषधांची नावे नेहमी कानावर पडत. डॉक्टर होण्याची इच्छाही त्यामुळे लहानपणापासूनच होती. तरुण वयात घरातल्या आयुर्वेदिक प्रॅक्टिसची चांगली जाण यायला लागली. त्यातच डॉ. आनंद यांना बीएएमएसला प्रवेश मिळाला. बीएएमएस करताना आयुर्वेदाची आणखी सखोल आणि विस्तृत माहिती मिळाली. आयुर्वेदाकडे बघण्याचा एक दृष्टीकोन निर्माण झाला. बालपणापासून मनावर झालेले आयुर्वेदाविषयीचे संस्कार, तरुणपणी समजलेला आयुर्वेद आणि पदवी घेत असताना त्याला मिळालेली सैद्धांतिक जोड यातून हा दृष्टीकोन जन्मला होता.
त्यानंतर मुंबईला एमडी करत असताना रुग्ण संपर्कात यायला लागले. घरातल्या आयुर्वेदिक परंपरेमुळे काही रुग्णही पिढ्यानपिढ्या संपर्कात होते. ते आणि कुणाच्या रेफरन्सने किंवा नाव ऐकून नव्याने आलेले रुग्ण कायम राहिले. त्यांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास दिवसागणिक वाढत गेला. या सगळ्याचे फलित म्हणून मुंबईत प्रॅक्टिस सुरु झाली आणि ती आता चांगली जमली आहे, असे डॉ. आनंद सांगतात.

आयुर्वेदात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नगरचे वैद्य प्र. शि. पवार, वैद्य भणगे सर आणि वैद्य प्र. ता. जोशी यांच्यामुळे आयुर्वेदाची जी काही समज होती तिला प्रॅक्टिकल रूप देण्यास मदत झाली. धुळ्याचे वैद्य प्रवीण जोशी, पुण्याचे वैद्य समीर जमदग्नी, सायन-मुंबईचे वैद्य नितीन कामत यांच्याकडूनही प्रॅक्टिसबाबत खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. ही सगळी शिदोरी सोबत घेऊन सध्या डॉ. आनंद आणि त्यांच्या पत्नी डॉ. अमृता कुलकर्णी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत.
स्वामी विवेकानंद हे डॉ. आनंद यांचे तरुणपणापासूनचे आदर्श. त्यांच्यासारखे किमान एकातरी भारतीय शास्त्रात पारंगत व्हायचे आणि देशसेवा करायची, असे त्यांच्या मनात बिंबलेले होते. घरातला आयुर्वेदाचा वारसा, मनात डॉक्टर होण्याची इच्छा आणि त्याला घरच्यांचे मिळालेले पाठबळ या सगळ्याच्या पायावर आयुर्वेदिक प्रॅक्टिसच करायची असे डॉ. आनंद यांनी पहिल्यापासून ठरवलेले होते. आयुर्वेद हे संपूर्ण आणि शाश्वत शास्त्र आहे. हजारो वर्षांची शास्त्रीय परंपरा त्यापाठीमागे आहे. त्यात मानवी शरीराचा सुक्ष्मतम विचार करून रोगनिदान, औषधनिर्मिती, चिकित्सा आणि उपचारपद्धती याची निर्मिती करण्यात आली आहे. आयुर्वेदातला सर्वात मोठा विचार म्हणजे निरोगी राहण्यासाठीचे नियमितपणे करायचे उपाय. ‘उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा’ असे वाक्य अलीकडे डॉक्टर सर्रास वापरू लागले आहेत. परंतु आयुर्वेदात हा विचार हजारो वर्षांपूर्वी केला गेला आहे. शरीरातील विविध द्रव्यांचे संतुलन राखण्यासाठी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टी, फळे, रोजच्या वापरातील पदार्थ यांचा वापर करून अशाप्रकारचे निरोगी आणि सुदृढ जीवन जगण्याची कला आयुर्वेदानेच शिकवली आहे. त्यामुळे त्याचा जीवनात प्रत्येक ठिकाणी उपयोग होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार आयुर्वेदाचे शिक्षण घेताना मनात पक्का होत होता. त्यातून आयुर्वेदिक प्रॅक्टिसच करायची, हा डॉ. आनंद यांचा निश्चय दृढ होत गेला.
घरातील आयुर्वेदाच्या वारशापासून प्रत्यक्ष आयुर्वेदिक प्रॅक्टिसपर्यंतची वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची वाटचाल खूप समाधानकारक आहे. यामुळे आयुर्वेद या अत्यंत महत्त्वाच्या शास्त्राची, समाजाची आणि पर्यायाने देशाचीही सेवा करता येते. कारण ज्या देशाचे नागरिक सुदृढ, निरोगी असतील तो देश जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांत वेगाने घोडदौड करू शकतो, असे मत डॉ. आनंद व्यक्त करतात.
लायन्स क्लब ठाणे या संस्थेबरोबर चांगले नाते असल्याचे सांगताना डॉ. आनंद म्हणतात की, लायन्स क्लबमुळे समाजसेवेचे एक वेगळेच दालन  खुले झाले. लायन्स क्लबसह अन्य ठिकाणी आयुर्वेद शिबिरे आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. अशा शिबिरांच्या माध्यमातून दोघेही समाजात आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करत आहेत. डॉ. हरिश पाटणकर आणि केशायुर्वेदबाबत आधीपासूनच माहिती होती. त्या संकल्पनेविषयी उत्सुकता आणि विश्वासही होता. ही संकल्पना काळाची गरज असून, आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसारासाठी आणि रुग्णांना उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी याचा फायदा होईल, असे सुरवातीलाच वाटल्याचे डॉ. आनंद सांगतात. केशायुर्वेदशी अगदी सुरुवातीलाच जोडले गेलो असतो. पण काही कारणास्तव या परिवारात सामील होण्यासाठी 2018 उजाडले, असेही ते नमूद करतात.
केशायुर्वेद ही एक नवी सिस्टीम आहे. आयुर्वेदात अशा प्रकारची प्रगती आम्हा उभयतांना खूप भावली. त्यामुळे केशायुर्वेदबरोबरचा प्रवास नव्या दमाने सुरु झाला. केशायुर्वेद सुरु केल्यानंतर वैद्यकीय सेवेत खूप फरक पडला. रुग्णांच्या दृष्टीकोनातही मोठा फरक पडला. केशायुर्वेद म्हणजे आयुर्वेदातली शास्त्रशुद्ध पद्धत आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा काळाच्या गरजेनुसार साधलेला उत्तम मिलाफ आहे. यामुळे केशचिकित्सा आणि उपचाराला एक नवा आयाम मिळाला आहे. त्यामुळे केस आणि केसाची त्वचा याची फोटोग्राफी, नमुन्यांची तपासणी, तपासणीचे अहवाल या सगळ्यामुळे केवळ रुग्णांमध्ये नाही, तर डॉक्टरांमध्येही नवा आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे रुग्णांना कमी वेळेत रिझल्ट मिळाल्यामुळे त्यांचा आयुर्वेदावरचा विश्वास वाढला. केशायुर्वेद सुरू केल्यापासून लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे, असे डॉ. आनंद सांगतात.
वेगवेगळे पेशंट केसाच्या वेगवेगळ्या समस्या घेऊन येतात. त्यांचे सॅम्पल्स आम्ही केशायुर्वेदच्या प्रयोगशाळेत पाठवतो. तिथे त्यांची तपासणी करून अहवाल पाठवले जातात. या सगळ्यातून संशोधनासाठी एक चांगला डेटाबेस तयार होत आहे. याचा उपयोग आम्हाला आताही होतो आहे आणि येत्या काळातही होईल. पण येणार्या पिढ्यांसाठी शास्त्रीय पद्धतींवर आधारीत असलेली ही माहिती सहज उपलब्ध होऊ शकणार आहे हेही महत्त्वाचे असल्याचे डॉ. आनंद सांगतात.
केशायुर्वेदाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यातून आम्हा डॉक्टरांची एक नवी कम्युनिटी तयार झाली. केशायुर्वेदची प्रॅक्टिस करणार्या डॉक्टरांना येणार्या समस्यांबाबत आम्ही आपपसांत चर्चा करतो. पाटणकर सर वेळोवेळी मार्गदर्शन करतात. यामुळे डॉक्टर अपडेटेड राहतात, असेही डॉ. आनंद सांगतात. केशायुर्वेदची ही शृंखला वेगाने वाढत आहे आणि ती अशीच वाढत राहणार, असा विश्वासही डॉ. आनंद व्यक्त करतात.